विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. काँक्रिट रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाही. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कामात चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ( Action will be taken if any mistake is found in road work warns Eknath Shinde)
पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत. मॅनहोल, रस्त्यांलगतचे सांडपाणी वाहिन्यांची प्राधान्याने स्वच्छता करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज दुपारी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे विभागातील काँक्रिट रस्ते कामांची पाहणी केली. बॉम्बे हॉस्पिटल जवळील चौक येथून रस्ते पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर सी विभाग, एफ उत्तर विभाग व एम पश्चिम विभाग या विभागांमधील सिमेंट रस्ते कामांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना अपघातमुक्त, खड्डेमुक्त असा सुखकर व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर व संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत 1 हजार 333 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे दोन टप्प्यांमध्ये सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 700 किलो मीटरचे रस्ते, तर दुसऱ्या टप्प्यात काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 400 किलो मीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. एम 40 या ग्रेडचे कॅंक्रीट रस्त्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरत असून सर्वाधिक भार क्षमता वाहून नेण्याचे त्याचे वैशिष्ट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 हजार 333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण 698 रस्त्यांची कामे (324 किलोमीटर), तर दुसऱ्या टप्प्यात एकूण 1420 रस्त्यांचे (377 किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे वेळेत पण दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने व्हायला हवी, त्यात हलगर्जीपणा नको. कामात चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा नक्कीच सन्मान करू. रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांची नावे आणि संपर्क क्रमांक असलेले फलक रस्त्यांवर लावण्यात यावा, अशी सुचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. मे अखेरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.