विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या आरोग्याचे रहस्य उघड करत अनेकांना प्रेरणा दिली आहे. आपल्या दिनचर्येमध्ये नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि गाढ झोप यांचा अवलंब केल्यामुळे ते आता सर्व औषधांपासून मुक्त आहेत. “मी गेली कित्येक वर्षे कोणतीही औषधे घेत नाहीये. यामागचं रहस्य आहे माझी शिस्तबद्ध जीवनशैली,” असे ते म्हणाले. ( 2 hours of exercise 6 hours of sleepAmit Shahs health mantra)
नवी दिल्ली येथे जागतिक यकृत दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस (ILBS) च्या एका कार्यक्रमात अमित शहा यांनी हे सांगितले.
अमित शहा यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की, दिवसभरात किमान दोन तास व्यायाम आणि सहा तासांची गाढ झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही जीवनशैली केवळ शरीराच्या आरोग्यासाठी नाही तर मानसिक स्थैर्यासाठीही उपयुक्त आहे. माणूस कामाच्या रगाड्यात स्वतःला विसरतो, पण जर शरीरच साथ देणार नसेल, तर मोठी ध्येयं साध्य होऊ शकत नाहीत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना मधुमेह, रक्तदाब, झोपेच्या समस्या आणि मानसिक तणाव अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठीच वेळेत झोप, सकस आहार, योगा, ध्यान आणि शारीरिक हालचाल या गोष्टींचे पालन गरजेचे आहे. “मी दररोज व्यायाम करतो, चालतो, योगा करतो आणि सातत्याने विश्रांतीसाठी वेळ देतो. यामुळेच माझं आरोग्य उत्तम आहे. मे २०२० पासून आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला आहे. आवश्यक प्रमाणात झोप, पाणी आणि आहार आणि नियमित व्यायामाने मला खूप काही दिले आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधांपासून आणि इन्सुलिनपासून मुक्त आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
देशातील तरुणांना अजूनही ४०-५० वर्षे जगायचे आहे आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यायचे आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शरीरासाठी दोन तास व्यायाम आणि मनासाठी सहा तास झोप राखून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.