विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले. दहशतवाद्यांना सोडणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. (Prime Minister directs strict action against terrorists)
‘पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये आयबी प्रमुख आणि गृहसचिव उपस्थित होते. बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी, त्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री शाह म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती दिली आहे. शिवाय, हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असा निर्धार गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.