विशेष प्रतिनिधी
जळगाव : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचे असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. ( Ladki Bahin happy with Rs 1500 no one said they would pay Rs 2100claims Narhari Zirwal)
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते.
लाडक्या बहिणींना 2100 ऐवजी 1500 रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नसल्याने लाडक्या बहिणी नाराज आहेत. असा प्रश्न पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारला. यावर बोलताना लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी आधी म्हटले की महायुती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे 1500 रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटले की 2100 रुपये देणार आणि मग 1500 रुपये दिले नाहीत तर 2100 कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले तर आता 2100 रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूश आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.
आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवदेन देताना म्हटले होते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे म्हटलेलो नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही, त्या पद्धतीने आमचे काम चाललेले आहे, असे अजित पवार म्हणाले होते.