विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : आमच्या सैन्याचे बजेट तुमच्या देशाच्या बजेटपेक्षा जास्त आहे पाकिस्तानी नेत्यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ नये. इतर कोणत्याही देशातील निष्पाप लोकांना मारले तर कोणीही शांत बसणार नाही, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. ( Our military budget is more than your countrys budget Asaduddin Owaisi tells Pakistan)
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतरही पाकिस्तान सरकारमधील मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्रांची धमकी दिली होती. गौरी, शाहीन आणि गझनवी ही क्षेपणास्त्रे फक्त भारतासाठीच ठेवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही भारताला युद्धाची धमकी दिली होती. माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी, पाकिस्तानने पाणी रोखण्याचा कोणताही निर्णय युद्धाची घोषणा मानला जाईल, असा इशारा दिला होता. या सर्वांचा ओवैसी यांनी समाचार घेतला आहे.
ओवैसी म्हणाले, तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात? तुम्ही तर अधम व्यक्तीपेक्षाही वाईट आहात. तुम्ही तर इसिसचे उत्तराधिकारी आहात, हे दिसते. निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारून मारणे हा आपला धर्म नाही. पाकिस्तानात बसून जे वायफळ बडबड करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तुमचे राष्ट्र फक्त अर्धा तास नव्हे तर, अर्धशतक मागे आहे,
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयानक शिक्षा मिळेल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या निर्धाराचे ओवैसी यांनी गुरुवारी स्वागत केले. राष्ट्रीय हितासाठी सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असेल. आरोप निश्चित करून दहशतवाद्यांना शिक्षा होईल, तेव्हाच पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.