विशेष प्रतिनिधी
मुंबई : “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, कारण त्यांचा हेतू भारतात हिंदू-मुस्लिम वाद उभा करण्याचा होता,” असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले आहे. ( Abu Azmi saidterrorists opened fire asking about religion to create HinduMuslim divide in the country)
ते म्हणाले, “काश्मीरमधील या हल्ल्याचा देशभरातील मुस्लीम समाजाने जोरदार निषेध केला आहे आणि सर्व मुस्लीम सरकारसोबत खंबीरपणे उभे आहेत. तरीही भारतातील मुसलमानांवर अन्याय का केला जातोय, असा सवाल आम्ही उपस्थित करतो.”
“हल्ल्यावेळी स्थानिक मुस्लीम बांधवांनी बचावासाठी धाव घेतली, मदत केली. तरीही देशात, विशेषतः मुंबईच्या दादरसारख्या भागात, निष्पाप मुसलमानांना मारहाण केली जात आहे,” असा आरोप करत त्यांनी सरकारकडे आणि मोहन भागवत यांच्यासह सर्व नेत्यांकडे विनंती केली की, “जातीयवाद होऊ देऊ नका.”
आझमी यांनी पुढे सांगितले की, “सरकार ज्या नव्या गोष्टी आणते आहे, त्या मुस्लिम विरोधी आहेत. वक्फ बोर्ड कायदा देखील आम्हाला नको आहे. सध्याचा वातावरण हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण करण्यासाठी बनवले जात आहे.”
त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही टीका केली. “संविधानाची शपथ घेतलेले आमदार जाहीर कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम विभाजन करणारी वक्तव्य करतात. नितेश राणे रत्नागिरीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला सांगतात. त्यांच्या विरोधात मी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे व पत्रही दिले आहे. पुन्हा एकदा आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र देणार आहोत,” असे आझमी यांनी स्पष्ट केले.