विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांनी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला राष्ट्राभिमानाने भरलेले सडेतोड उत्तर दिले आहे. धवन यांनी आफ्रिदीला कारगिल युद्धाची जळजळीत आठवण करून देत, भारतीय लष्कराच्या पराक्रमावर बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या देशातील दयनीय परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला आहे.
( Shikhar Dhawan slams Shahid Afridi ‘You were defeated in Kargil now be wise!)
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आफ्रिदीने भारतीय लष्करावर टीका करताना सैनिकांवर हल्ला थांबवण्यात अपयशाचा आरोप केला होता. या हल्ल्यात २६ निरपराध भारतीय पर्यटकांचे बळी गेले होते. आफ्रिदीच्या या बेसावध वक्तव्यावर उत्तर देताना शिखर धवन यांनी आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिले –
“कारगिलमध्येही हरवले होते, आधीच इतके गडगडले आहात, अजून किती पडणार? उगाच चुकीच्या कमेंट्स करण्यापेक्षा स्वतःच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं वापरा @SAfridiOfficial. आम्हाला आमच्या भारतीय लष्कराचा अपार अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!”
धवन यांच्या या राष्ट्राभिमानाने भारलेल्या प्रत्युत्तराने भारतीय जनतेचे हृदय जिंकले आहे. भारताचे वीर जवान सीमारेषेवर अविरत जागर करून देशाच्या सुरक्षेची हमी देतात, हे धवन यांनी ठामपणे अधोरेखित केले.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट सध्या प्रचंड खराब अवस्थेत असून पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेतही प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत निराशाजनक आहे. त्यामुळे आफ्रिदीने भारतावर टीका करण्याऐवजी आपल्या देशातील दारिद्र्य, अराजकता आणि अपयशांकडे लक्ष द्यावे, असा सूचक संदेश शिखर धवन यांनी दिला आहे.