विशेष प्रतिनिधी
जळगाव जामोद : राजावर प्रचंड ताण असेल, देशाच्या तिजोरीत खडखडाट जाणवेल, मात्र संरक्षण व्यवस्था मजबूत राहिल्यामुळे शत्रू काहीही हानी करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीत वर्तवण्यात आली आहे. ( King Under Pressure Treasury Strained But Nation Safe from Enemy Bhendwal Ghatamandani Prediction)
प्रत्येक वर्षीप्रमाणे १ मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट उघडण्यात आली. घटातील मसूर हे शत्रूचे प्रतीक असलेले धान्य थोड्याशा प्रमाणात दबलेले आढळले, त्यामुळे शत्रूंच्या हालचाली सुरू राहतील, पण करडी धान्य म्हणजेच संरक्षण यंत्रणा मजबूत राहिल्यामुळे देशावर कुठलाही मोठा आघात होणार नाही, असा विश्वास या भविष्यवाणीतून व्यक्त करण्यात आला.
या वर्षी शेतकऱ्यांसाठी हवामान सर्वसाधारण ते आशादायक असेल. जूनमध्ये पावसाचे आगमन सामान्य, जुलै व सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तर ऑगस्टमध्ये पावसाचा जोर थोडा कमी असेल. मात्र अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल आणि त्याचा परिणाम पिकांवर होईल. काही भागांत पिके जास्त येतील तर काही ठिकाणी नुकसान होईल. पीकांवर रोगराईसह भावाच्या चढ-उतारांचा फटका बसेल, असा इशाराही घटमांडणीतून देण्यात आला आहे.
या वर्षी घटात मांडलेल्या १८ धान्यांमध्ये विविध प्रकारचे फेरबदल दिसून आले. त्यावर आधारित अंदाज वर्तवून ही भविष्यवाणी करण्यात आली. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या घटमांडणीसाठी उपस्थिती लावली होती. भेंडवळ घटमांडणी ही राज्यातील पारंपरिक आणि श्रद्धास्थानी मानली जाणारी भविष्यवाणी असून दरवर्षी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.