विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलीच संतापलेले दिसत आहेत. उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी असा निर्णय घेता येणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत कर्जमाफीसारख्या निर्णयासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो, अशा शब्दात त्यांन पत्रकारावरच संताप व्यक्त केला. ( Ajit Pawar got angry at the journalist even if you become the Chief Minister tomorrow loan waiver is not possible!)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा महायुती सरकारच्या जाहीरनाम्यातील एक महत्त्वाची बाब होती. निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतर १०० दिवस उलटले तरीही कर्जमाफीसंदर्भात सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यांनी “मी असं कुठे आश्वासन दिलं आहे का?” असा उलट प्रश्न केला होता. यानंतर शनिवारी पुन्हा याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार थेट भडकले. “शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही, असा निर्णय महायुतीने घेतला आहे का?” असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर अजित पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “असं तुला कोणी सांगितलं? उद्या तू जरी मुख्यमंत्री झाला तरी असा निर्णय घेता येणार नाही,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कर्जमाफीसारख्या निर्णयासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो.
जेव्हा राज्याच्या आर्थिक परिस्थितीला झेपेल आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर परिणाम होणार नसेल, तेव्हाच कर्जमाफीचा विचार केला जाईल,” असे अजित पवार यांनी ठामपणे नमूद केले.