पुणे : विश्रांतवाडीमधील कळस येथे पायी निघालेल्या महिलेला अडवून सराईत गुन्हेगाराने
भर चौकात तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ( Woman molested in a public square Case registered against the culprit and his accomplices)
संकेत सावंत (वय २८, रा. योग सोसायटी, कळस, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विश्रांतवाडी भागात राहते. ती आळंदी रस्त्यावर कळस येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे जात होती. दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी तिची छेड काढली. त्यामध्ये संकेत जाधव तिथे होता. ‘मी या भागातला दादा आहे. तू खूप सुंदर दिसते’ असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. तसेच सावंत याच्यासोबत असलेल्या दोघांनी अश्लील शब्दांचा वापर करून महिलेशी संवाद साधला. या प्रसंगानंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तिने फिर्याद दिली. पोलिसांनी संकेत सावंत याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.