विशेष प्रतिनिधी
पुणे: स्काईप अॅपद्वारे संपर्क साधून सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करून कारवाईची भीती दाखवून एमबीए विद्यार्थ्याची ४३ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ( MBA student cheated of Rs 43 lakhs by fearing CBI action)
वेंकटरमणा शनमुगन (वय २३, रा. रामनगर, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थी बालेवाडी भागात राहण्यात आहे. तो पुण्यातील एका खाजगी विद्यापीठात शिक्षण घेत आहे. २ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरट्यांनी स्काईप अॅपद्वारे शनमुगन याच्याशी संपर्क साधला. आरोपीने दिल्लीतून सीबीआय कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्या नावाने काही खटले दाखल आहे. त्याची चौकशी करण्यासाठी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला असल्याचे आरोपीने सांगितले. तसेच फिर्यादीकडे आधार कार्डबाबत विचारणा केली. तसेच संबंधित आधार कार्डवर तब्बल ५० खटले दाखल असल्याची भीती आरोपींनी फिर्यादीला घातली. कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे चोरट्याने सांगितले.
दरम्यान, मागील पाच ते सहा महिन्यांत चोरट्यांनी आरोपीला धमकाविले. वेळोवेळी त्याच्याकडून पैसे उकळले. तरुणाने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ४२ लाख ९५ हजार ६३७ रुपये जमा केले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्याकडे आणखी रक्कम मागितली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.