विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात अनेक पर्यटकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिल्लीतील ‘संस्कृती जागरण महोत्सवा’मध्ये स्पष्ट शब्दांत आश्वासन दिले की, “भारतावर हल्ला करणाऱ्यांना योग्य प्रतिउत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, तुमची जी इच्छा आहे, ती नक्कीच पूर्ण होणार आहे. ( Defence Minister Rajnath Singh said your wish will definitely come true!)
राजनाथ सिंह पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करताना म्हणाले, “तुम्हाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाडसी निर्णय घेण्याची ताकद माहिती आहे. त्यांनी कधीही राष्ट्रविरोधी शक्तींना माफ केलेले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात जे आहे, त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, यात शंका नाही. ते म्हणाले, आपले जवान रणभूमीवर देशाचे संरक्षण करतात. आपले संत जीवनभूमीवर भारताच्या अध्यात्मिक मूल्यांचे रक्षण करतात. माझे कर्तव्य सीमांची सुरक्षा करणे आहेच, पण त्याहीपेक्षा मोठे कर्तव्य म्हणजे जो कोणी भारताकडे डोळे वटारून बघण्याचे धाडस करतो त्याला चोख प्रत्युत्तर देणे आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन संरक्षण दलांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. कारवाई कधी, कुठे आणि कोणावर करायची, हे ठरवण्याचा अधिकार आता थेट लष्कराकडे देण्यात आला आहे.