ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज राजधानी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारताची ठाम, अचूक आणि जबाबदार भूमिका राष्ट्रासमोर प्रभावीपणे मांडली. Operation Sindoor: India’s Daughters Respond with Precision, Pride, and Purpose
पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर आणि निरपराध नागरिकांवर करण्यात आलेल्या अमानवी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर, भारताने फक्त दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजनबद्ध कारवाई करत जगासमोर शांतताप्रिय पण सक्षम राष्ट्राची ओळख अधोरेखित केली आहे. ही कारवाई केवळ लष्करी नव्हे, तर भारताच्या स्वाभिमानाचे आणि नागरिकांच्या सुरक्षेचे प्रभावी उत्तर होते.
“पाकिस्तानने आपल्या भगिनींच्या सिंदूरावर घाव घातला, पण भारताच्या ‘लेकींनी’ त्याला जशास तसे उत्तर दिलं”, असा स्पष्ट आणि ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेत दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी अचूकतेने, शौर्याने आणि अभिमानाने आपली भूमिका मांडत भारतीय महिलांची राष्ट्रसेवेतील भूमिका ठळकपणे समोर आणली.
“खरे वीर कुठलाही धर्म पाहत नाहीत, ते केवळ राष्ट्रकर्तव्य पाळतात हेच या परिषदेतून समोर आले त्यामुळे धार्मिकतेच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले.
या पत्रकार परिषदेद्वारे भारताने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं की –
“भारताची खरी ओळख ही एकतेत, समतेत आणि कर्तव्यनिष्ठेत आहे. आमचा उद्देश युद्ध नव्हे, शांती आहे. मात्र शांततेवर हल्ला झाला, तर उत्तर देण्याची पूर्ण ताकद भारतात आहे.”
“एकता होती, आहे आणि सदैव राहील — हाच भारताचा आत्मा आहे!”
या वाक्यातून देशवासीयांना आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि सहिष्णुतेचा सशक्त संदेश दिला गेला.
ही पत्रकार परिषद केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती भारतीय सशस्त्र दलांच्या निडर नेतृत्वाची आणि महिलांच्या राष्ट्रसेवेतील महत्त्वपूर्ण सहभागाची प्रेरणादायी झलक ठरली.