विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या अचूक हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारतातील सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा तसेच त्याच्या निकटवर्तीय ४ जणांचा खात्मा करण्यात आला आहे. या घटनेला स्वतः मसूद अजहरने दुजोरा दिला असून, “या हल्ल्यात मीच मेलो असतो तर बरं झालं असतं,” असे त्याने म्हटले आहे.( Operation Sindoor shock: 10 members of Masood Azhars family killed a big blow to Jaish-e-Mohammed)
पाहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर तडाखेबंद कारवाई केली. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर शहरातील जैश ए मोहम्मदचे मुख्यालयही उद्ध्वस्त करण्यात आले. याच ठिकाणी मसूद अजहरचे कुटुंब वास्तव्य करत होते.
हल्ल्यात मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीचा परिवार, मौलाना कशफ साहबचे संपूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडे तसेच बाजी सादियाचा पती आणि तिच्या मुलीची चार अपत्ये यांचा समावेश असल्याचे जैश ए मोहम्मदने सांगितले. संघटनेने महिला आणि मुलांचाही मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
भारतीय सैन्याने ही कारवाई मध्यरात्री केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एकूण नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यामध्ये जैश ए मोहम्मदला जबरदस्त फटका बसला आहे.
मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहरला १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमान हायजॅक केल्याप्रकरणी अटक केले होते. त्यानंतर नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. २००१ साली मसूद अजहरच्या नेतृत्वात जैश ए मोहम्मदने भारतीय संसदेवर हल्ला केला होता. २००० मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा, २०१६ साली पठाणकोट एअरबेस आणि २०१९ साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.