विशेष प्रतिनिधी
पुणे : भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, कोंढवा पोलिसांनी एका १९ वर्षीय युवतीविरुद्ध ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि भारताविरोधातील मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ( 19-year-old girl arrested in Kondhwa for posting Pakistan Zindabad)
सुभाष महादेव जरांडे (पोलीस हवालदार, गोपनीय पथक, कोंढवा पोलीस ठाणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान सोशल मीडियावर नजर ठेवताना त्यांना ‘REFORMISTAN/DR. MAARIB’ या अकाउंटवरून एक आक्षेपार्ह मजकूर दिसून आला. या मजकुरात भारताविरोधात, हिंदुत्वाविरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह विधानं होती. यामध्ये भारताने कोणताही पुरावा नसतानाही पाकिस्तानवर युद्ध लादल्याचा आरोप, काश्मीरमधील धोरणावर टीका आणि ‘Pakistan Zindabad’ अशा आशयाचा मजकूर होता.
हा मेसेज एका युवतीने तिच्या इंस्टाग्राम हँडल i..khad वरून पोस्ट केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सामाजिक शांततेला बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवतीविरोधात भारतीय न्याय संहिता (IPC) अंतर्गत कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिला अटक करण्यात आली आहे.
कोंढवा पोलीस पुढील तपास करत असून, सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून देशविरोधी भावना पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिला आहे.