विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा खोटारडा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. ( India attacked first India will have to pay the pricePakistan Prime Minister Shahbaz Sharifs false claim)
शनिवारी रात्री भारतीय वेळेनुसार ११:३० वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशवासीयांना उद्देशून भाषण करताना पुन्हा एकदा खोटा दावा करत म्हटलं की, या संघर्षात पाकिस्तान पुन्हा एकदा जिंकला असल्याचा दावा केला. त्यांनी पाकिस्तान आर्मीचे प्रमुख असीम मुनीर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत “आम्हाला तुमचा अभिमान आहे” असं म्हटलं.
या लढाईचा शेवटपर्यंत पाठलाग करू. पाकिस्तानची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लष्कर आणि जनता दोघंही समर्थ आहेत. आम्ही लष्कर बनून शत्रूला पराभूत करू,” असं वक्तव्य करत शरीफ यांनी पुन्हा भारतविरोधात उघडपणे युद्ध पुकारण्याची भाषा केली.
शरीफ म्हणाले, “भारताने पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली पाकिस्तानवर हल्ला केला. आम्ही आधीच या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. पण भारताने आंतरराष्ट्रीय कायदे झुगारून चुकीचा मार्ग स्वीकारला.” जम्मू-काश्मीरबाबत त्यांनी पुन्हा एकदा “हा एक अपूर्ण वाद आहे,जो काश्मिरींना हक्क मिळेपर्यंत सुटणार नाही,” असं म्हटलं.
शरीफ यांनी खोटा दावा करत म्हटलं, “भारताने केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध पाकिस्तानी नागरिक शहीद झाले, त्यामध्ये स्त्रिया आणि मुले होती. पण आमच्या वायुदलाने आपल्या हद्दीतच राहून भारतीय विमानांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यांचे तुकडे केले.”
भारताकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही. मात्र सूत्रांनी स्पष्ट केलं की, भारतानं केवळ दहशतवादी तळांवर टार्गेटेड स्ट्राईक केल्या असून नागरी ठिकाणांवर कुठलीही कारवाई केली नाही.