विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताकडून जोरदार तडाखा बसल्याने हतबल झालेल्या पाकिस्तानने भारताविरोधातील कथित लष्करी कारवाई असल्याचे दाखवत एक व्हिडिओ शेअर केला. सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ गेम ‘ARMA 3’ मधील व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पाकिस्तान जगभरात थट्टेचा विषय बनला आहे.
( Global Embarrassment for Pakistan Shares Video Game Footage as Military Strike Against India)
प्रत्यक्ष कारवाई असल्याचा दावा करत पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तारार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. मात्र तो व्हिडीओ गेममधील दृश्य असल्याचे यूके डिफेन्स जर्नल (UK Defence Journal ) आणि नेटिझन्सनी उघडकीस आणलं.
व्हिडीओमध्ये CIWS (Close-In Weapon System) द्वारे टार्गेटला लक्ष्य केलं जातंय, असं दाखवण्यात आलं होतं. मंत्री तारार यांनी या व्हिडीओसह पाकिस्तान लष्कराचे कौतुक करत म्हटलं की, “भारताच्या आक्रमकतेला दिलेलं हे तडाखेबाज उत्तर आहे.” त्यांनी भारताच्या “युद्धखोर वृत्तीवर” टीका करत पाकिस्तानकडून “योग्य प्रत्युत्तर” दिल्याचा दावा केला होता.
त्यानंतर जागतिक लष्करी विश्लेषक, गेम्स खेळणारे आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ Bohemia Interactive या कंपनीचा ‘ARMA 3’ या प्रसिद्ध सिम्युलेशन गेममधून घेतल्याचं स्पष्ट केलं. ही गेम वास्तववादी लष्करी मिशन्ससाठी प्रसिद्ध असून त्याचे अनेक व्हिडीओ वास्तविक कारवाईसारखे दिसतात. ARMA 3 हा गेम उच्च दर्जाच्या ग्राफिक्ससह युद्ध सिम्युलेशनसाठी ओळखला जातो. अगदी प्रत्यक्षात युद्ध सुरू असल्याचे यामध्ये दिसू शकते.
या हास्यास्पद चुकीमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या ट्विटरवर #Arma3 आणि #FakePakStrike हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
अजूनही पाकिस्तान सरकारने यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. हा व्हिडीओ अधिकृत ट्विटर हँडलवर तसाच कायम आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी करण्यात आली होती. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून सतत युद्धविरामाचे उल्लंघन होत असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.