नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेने मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, देशभरात या यशाचे जोरदार स्वागत केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून १३ मेपासून ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात येणार असून, २३ मेपर्यंत विविध राज्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे.
( BJP to hold Tiranga Yatra across the country to celebrate the success of Operation Sindoor 10-day celebration from May 13)
भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचा उद्देश म्हणजे ऑपरेशन सिंदूरमधील यशाची माहिती देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे आणि भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल जनजागृती करणे आहे. या यात्रेद्वारे देशाचा स्वाभिमान कसा बळकट केला गेला, हा संदेश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
यात्रेचे नियोजन आणि संयोजनाची जबाबदारी पक्षातील प्रमुख नेते डॉ. संबित पात्रा, विनोद तावडे आणि तरुण चुग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या यात्रेचे नेतृत्व विविध भागांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते करतील. तिरंगा यात्रेत देशभक्तिपर गीतं, शौर्य झांज, व्हिडिओ सादरीकरण आणि शहीद जवानांना अभिवादन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.
भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे फक्त लष्करी विजय नव्हे, तर राजकीय इच्छाशक्तीचंही प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळकट नेतृत्वामुळे हे ऑपरेशन शक्य झाले. राफेल विमानांनी या मोहिमेत निर्णायक भूमिका बजावली असून, सर्व वैमानिक सुरक्षितपणे परतल्याने आपल्या लष्कराची क्षमता सिद्ध झाली आहे.”
ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे शंभर टक्के साध्य झाल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरोधात नव्हती, तर भारताच्या स्वाभिमानासाठी होती. भाजपकडून या यात्रेद्वारे देशभर एकात्मता, देशभक्ती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर जनजागृती केली जाणार आहे. यात्रेमुळे युवकांमध्येही राष्ट्रीयतेचा भाव जागृत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.