विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘ट्री अॅम्ब्युलन्स’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ५ जून रोजी, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. ( Tree Ambulance for the health of trees Pune Municipal Corporations innovative initiative from June 5)
शहरात रस्त्यांचे रुंदीकरण, विकासकामे आणि वाढत्या नागरीकरणामुळे अनेक झाडांची कत्तल झाली आहे, तर काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले असले तरी ती टिकण्याच्या दृष्टीने शाश्वती कमी आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून झाडांचे रक्षण करण्याची सातत्याने मागणी केली जात होती. या मागण्यांची दखल घेत महापालिकेने ‘ट्री अॅम्ब्युलन्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
या ट्री अॅम्ब्युलन्समध्ये झाडांचे निरीक्षण, उपचार आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक उपकरणे असतील. झाडांमध्ये ठोकलेले खिळे काढणे, सुकलेली फांद्या छाटणे, खत घालणे, कीडनाशक फवारणी आदी कामांसाठी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. फक्त सार्वजनिक नव्हे तर खाजगी मालकीच्या झाडांचीही देखभाल या माध्यमातून केली जाणार आहे.
उद्यान विभागाच्या मदतीने शहरातील विविध भागांमध्ये ही अॅम्ब्युलन्स सेवा फिरवली जाणार असून झाडांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. पहिल्या १५ दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम शहराच्या विविध भागांत राबविण्यात येणार आहे.
महापालिका एक हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार असून नागरिक आपल्या परिसरातील झाडांच्या अडचणी या क्रमांकावर कळवू शकतील. त्या माहितीच्या आधारे ट्री अॅम्ब्युलन्स संबंधित झाडापर्यंत पोहोचून तातडीने उपाययोजना करेल. या कामासाठी विशेष कर्मचारी वर्ग तयार केला जाणार आहे.
अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले की, या उपक्रमात शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग नोंदवावा, जेणेकरून अधिक व्यापक पातळीवर झाडांचे रक्षण करता येईल.
झाडांचे आरोग्य जपणे ही केवळ जबाबदारी नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यावश्यक पाऊल आहे. पुणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील हरित पट्टा अधिक सक्षम आणि सुदृढ होण्याची आशा व्यक्त होत आहे.