विशेष प्रतिनिधी
पुणे : कंपनीत कामावर निघालेल्या एका महिलेला ओढून नेत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण एमआयडीसीत घडला आहे. तिला मारहाण केली आणि घडलेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता केली किंवा तोंड उघडलं तर जीवे मारेन अशी धमकीह त्याने दिली. ( Woman dragged and raped while going to work)
प्रकाश भांगरे असे बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव असून पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्याला बेड्या ठोकल्या.ही दुर्दैवी घटना 13 मेच्या रात्री सुमारे 11 च्या सुमारास घडली. पीडित महिला 27 वर्षांची असून चाकण एका कंपनीत काम करते. 13 मे रोजी ती रात्रपाळीच्या ड्युटीसाठी कामावर जात होती. मेदनकरवाडी येथील कंपनीच्या अगदी जवळ पोहचली होती. मात्र तेवढ्यात नराधम प्रकाश भांगरेने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या महिलेने नराधामचा खूप प्रतिकार केला, त्याला चावलीदेखील. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच जाणाऱ्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडितेने कसेबसे चाकण पोलिस स्टेशन गाठत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगत तक्रार दाखल केली. पीडित महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 24 तासांच्या आतच आरोपी प्रकाश भांगरेला बेड्या ठोकल्या. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलं. आरोपी सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला असला तरी तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.