विशेष प्रतिनिधी
नागपूर : पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यानेच एका मुस्लिम मुलीला शाळेत प्रवेशना करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . ( Sharad Pawars leader denied admission to a Muslim girl in school)
नागपूर मधीलदयानंद आर्य कन्या विद्यालयात मुस्लिम विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे करण्यात आली होती. यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील धक्कादायक बाबी उघड केल्या.
प्यारे खान यांनी सांगितले की, “नागपुरातील या शाळेत इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असताना एका मुस्लिम विद्यार्थिनीला केवळ तिच्या धर्माच्या आधारे प्रवेश नाकारण्यात आला. ही घटना दुर्दैवी असून संविधानाच्या मूलभूत हक्कांना धक्का देणारी आहे.”
या प्रकरणात आयोगाने शिक्षण विभागाकडून चौकशीचा आदेश दिला होता. चौकशीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते वेद प्रकाश आर्य हे संबंधित संस्थेचे सदस्य असून त्यांनीच मुस्लिम मुलीला प्रवेश न मिळावा म्हणून अडथळा निर्माण केला.
आयोगाकडे वेद प्रकाश आर्य यांनी मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्ये केल्याचे ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातील पुरावे देखील प्राप्त झाले आहेत. यामुळे आता त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली जाणार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.
“राज्यात जर अशा घटना घडत असतील, तर त्यावर कठोर आणि त्वरित कारवाई होणार. अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण ‘सबका साथ, सबका विकास’ हे असून त्याचा खरा अर्थ अंमलात आणण्यासाठी आम्ही सजग आहोत. अल्पसंख्याकांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असे खान यांनी ठामपणे सांगितले.