विशेष प्रतिनिधी
नारायणपूर (छत्तीसगड) : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबूझमाड जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत दोन कमांडर्स ठार झाले असून कारवाईत एक जवान शहीद आणि एक जखमी झाला आहे. ही चकमक बुधवारी सकाळपासून सुरू असून अद्यापही शोधमोहीम चालू आहे. ( Abuzmad operation deals a major blow to Naxalites 26 Naxalites including two)
ही कारवाई डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) च्या विशेष पथकांमार्फत करण्यात आली असून नारायणपूर, दंतेवाडा, बीजापूर आणि कोंडागाव येथील जवानांनी यात भाग घेतला. ही चकमक नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड परिसरातल्या बोटेर गावाजवळ घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षल संघटनेचे महासचिव आणि पोलिट ब्युरो सदस्य बसवा राजू यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही मोठी मोहीम आखण्यात आली. या माहितीच्या आधारे अनेक जिल्ह्यांतील DRG जवानांना तातडीने तैनात करण्यात आले आणि सुरक्षा दलांनी जंगल परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला.
दुपारी झालेल्या जोरदार चकमकीत बड्या कमांडरंसह २६ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून बंदुका, स्फोटके, रेडिओ सेट्स, नक्षल साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या चकमकीत सुरक्षादलांचा एक जवान शहीद झाला असून एक जखमी आहे.
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, “हे ऑपरेशन नक्षलवादाविरोधातील लढ्यात मोठे यश आहे. आपल्या जवानांनी अतुलनीय धाडस दाखवत शत्रूचा कणा मोडून काढला आहे. शहीद जवानाला आम्ही सलाम करतो.”
अबूझमाड परिसर गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात ‘लिबरेटेड झोन’ तयार करत नक्षलवाद्यांनी राज्य यंत्रणेला थारा दिला नव्हता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागात “मिशन अबूझमाड” अंतर्गत विकास आणि सुरक्षा या दोन्ही दिशांनी प्रयत्न सुरू आहेत.
या चकमकीनंतर नक्षल चळवळीच्या मध्य भारतातील नेतृत्वावर मोठा आघात झाल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून जंगलातील उरलेल्यांना पकडण्याचा आणि शस्त्रसाठा उघड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही कारवाई नक्षलवाद्यांसाठी निर्णायक ठरू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.