विशेष प्रतिनिधी
मुंबई : वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे ( सीआयडी) सोपवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( Rohini Khadse demands Chief Minister to hand over investigation into Vaishnavi Hagavane suicide case to CID)
ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिचे आई वडील पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तेव्हा दीड दिवस तिची मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर देखील जे कलम लावण्यात आले, ते कलम सौम्य प्रकारचे होते, असा आरोप खडसेंनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस होते. त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता. ज्यावेळी प्रकरण सीआयडीकडे गेले त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे सीआयडी तपासातून पुढे आले. वैष्णवी हगवणे प्रकरणातही मोठे पॉलिटिकल नेक्सस आहे. त्या आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणाही सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड होते की, तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत. हे प्रथम दर्शनीच्या अहवालामध्ये देखील नमूद आहे की, तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत. तिला क्रूरपणे मारहाण झाली आहे. हे तिच्या शरीरावरील जखमा बघताना दिसत आहे. माझा या निमित्ताने प्रश्न आहे की, तिच्या शरीरावर 29 ठिकाणी जखमा असताना त्या एफआरआयमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा जीव जाईल तोपर्यंत मारहाण करणे किंवा अशा अनेक कठोर कलमांचा समावेश का करण्यात आला नाही? कुठेतरी आरोपींना मदत होईल, अशा पद्धतीने ती एफआरआय नोंदवल्या गेली होती का? की ज्या एफआरआयचा आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होते आहे आणि त्याच एफआरआयच्या आधावरती आरोपींचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्य हणनापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. कारण एफआरआय नोंदवताना राहिलेल्या त्रुटी हे त्याचे कारण असल्याचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी म्हटले आहे.