Water Conservation Minister Sanjay Rathod will conduct watershed tour
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी पाणलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
राठोड म्हणाले, शेती, सिंचन या दृष्टीने मृद व जलसंधारण विभाग महत्वाचा आहे. राज्यात असलेले छोटे तलाव व पूर्व विदर्भातील मामा तलावातील गाळ उपसा, खोलीकरण करून त्याची सिंचन क्षमता वाढविण्यात येणार आहे.
राठोड म्हणाले, मृद व जलसंधारण विभाग, पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, व्यक्तींची मदत घेऊन विकासात्मक उपक्रम राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. मृद व जलसंधारण विभागही १०० दिवसांत राज्यात अनेक उपक्रम व योजना राबविणार येणार आहे.
राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची ही विशेष मोहीम असून, ३० जिल्ह्यांतील १५३० गावांमध्ये ही रथयात्रा नेली जाणार आहे. राठोड यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना आदी २० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.