विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई ते पुणे अंतर कमी करणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Missing link on Mumbai-Pune Expressway to be open by December)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे. पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असून, यात एकूण १२ पॅकेज आहेत. यातील नऊची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई – नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे.