विशेष प्रतिनिधी
नाशिक : “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बेजबाबदार वक्तव्य करायची सवय लागली आहे. त्यांनी शेतकऱ्यांची थेट भिकाऱ्याशी तुलना केली आहे. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये. अजित पवार यांचेही याच मत आहे,” अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ( Remove Kokat from the cabinet those who compare farmers to beggars says Raju Shetty)
शेट्टी यांनी उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. पाऊस थांबत नसल्याने द्राक्ष बागांमध्ये पाणी तुंबून गर्भधारणा होणं अशक्य झाले आहे, डाळिंबाची फुलं झडून गेली आहेत, उन्हाळी कांद्याचं नुकसान झाले आहे आणि भाजीपाला सडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नच कोसळलं आहे.
“हे सगळं घडत असताना कृषिमंत्री कोकाटे नाशिकचेच असूनही त्यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं. ते सातत्याने बेजबाबदार वक्तव्य करतात आणि शेतकऱ्यांचा अपमान करतात,” असा आरोप शेट्टींनी केला. ते पुढे म्हणाले, “सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिलं नाही, हमीभावही दिला नाही. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसाला आठवर पोहोचलं आहे. सरकारने वेळेत मदत केली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते. अर्थ खात्याच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत, पण कृषी खात्याला प्रोत्साहन नाही. हे त्यांचंच अपयश कोकाटेंनी आपल्या वक्तव्यांतून दाखवून दिलं.”
ओसाड गावाची पाटीलकी” या कोकाटेंच्या विधानावरून टीका करताना शेट्टी म्हणाले “नंदनवन बनवण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यांनी त्यासाठी काहीच केलेलं नाही. जिल्हा बँकांना वेळेवर मदत केली असती, तर आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. केवळ १ हजार कोटींची परतीच्या बोलीवर मदत जाहीर करण्यात आली आणि त्याऐवजी व्याज सवलतीच्या पाटीलकीत अडकवलं गेलं.”
बिबटे आता जंगलात कमी आणि मानवी वस्तीत जास्त दिसतात. लहान मुलांवर हल्ले वाढले आहेत. काही प्रकरणांत बिबट्याने मुलांना घरातून ओढून नेलं आहे. त्यामुळे वन्यजीव कायद्यात बदल करून बिबट्या, गवे, डुकरांसारख्या प्राण्यांच्या संतती नियमनावर सरकारने विचार करावा,” अशी मागणी शेट्टी यांनी केली.
महाराष्ट्रात नुकसानाचे प्रमाण कमी असल्याचा सरकारचा दावा खोटा ठरवताना ते म्हणाले, “हो, नुकसानाचे आकडे कमी असतील, पण ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांचं सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे, कांद्याचा भावच नाही आणि वेळेवर पैसे मिळणार असताना पाऊस झाल्याने उत्पन्न हातचं गेलं.”
राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला की, “जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय ठरणार नाही.”