विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या राजकीय गदारोळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, भाजपच्या आक्रमक आमदार चित्रा वाघ त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. एका व्यक्तीला टार्गेट करून प्रश्न सुटत नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणं गरजेचं आहे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यासंदर्भात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यभरातील विविध पक्षांच्या महिला नेत्या सहभागी होत्या. महिलांच्या सुरक्षेबाबत, तक्रार निवारणाच्या कार्यपद्धतीबाबत, आणि महिला आयोगाची कार्यक्षमता वाढवण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “मी स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम केलेलं आहे. त्यामुळे आयोगामधील अंतर्गत कार्यपद्धती मला माहिती आहे. एका घटनेच्या आधारावर संपूर्ण व्यवस्थेचा निषेध करून उपयोग नाही. मेलद्वारे येणाऱ्या शेकडो तक्रारींना उत्तर देण्यासाठी आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे एकट्या रूपाली चाकणकर यांच्यावर खापर फोडणं योग्य ठरणार नाही.”
चित्रा वाघ यांनी हेही स्पष्ट केलं की, “प्रत्येक प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. संबंधित केस मध्ये आयोगाने कोणती भूमिका घेतली, कुठे दुर्लक्ष झालं का, भरोसा सेलने काय कारवाई केली, हे सर्व स्पष्ट होणं गरजेचं आहे. महिला आयोगाला सशक्त करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पुढे आणखी बैठका घेतल्या जातील.”
राजकीय व्यक्ती आयोगाच्या अध्यक्षपदी असू नये, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “राजकीय नेतृत्वावर टीका करणारे विसरतात की, त्यांच्या कार्यकाळातही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच होत्या. रूपाली चाकणकर यांची ही दुसरी टर्म आहे आणि ती वैधानिक पद्धतीनं मिळालेली आहे.”
या संपूर्ण प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी विरोधकांना इशारा दिला की, राजीनामा मागणं सोप्पं असतं, पण महिला आयोगाची जबाबदारी आणि व्यवस्थेतील कमकुवतपणा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.