विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युतीची चर्चा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचा हात पुढे करत युतीच्या शक्यतेला अधिक बळ दिलं आहे. ( MNS-Thackeray alliance talks revivedNow Aditya Thackeray has extended his hand for applause)
पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “आमचं मन साफ आहे. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्याला आम्ही सोबत घेऊन काम करू. अलीकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलं. हेच उदाहरण पुरेसं आहे. लोकांच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे.”जो पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास तयार आहे, त्याच्याबरोबर आम्ही लढायला तयार आहोत. भावना आम्ही व्यक्त केली आहे, आता निर्णय आणि कृती समोर यावी अशी अपेक्षा आहे.”
युतीबाबत बोलताना संजय राऊत यांनीही सकारात्मक संकेत दिले. “राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी अनुकूल भूमिका घेतली. आम्ही सर्वांनीही योग्य पावले उचलली आहेत. त्यामुळे लवकरच काहीतरी स्पष्ट होईल,” असे त्यांनी सूचित केले.
दुसरीकडे मनसेकडून युतीविषयी साशंकता व्यक्त होताना दिसते. संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे म्हटले, “आजवर मनसेकडे युतीसाठी कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. केवळ माध्यमांमधून चर्चेचा गवगवा केला जातोय. खरेच सकारात्मक भूमिका असेल, तर ठोस कृती हवी. आजवर कुठेही प्रत्यक्ष कृती झालेली नाही. हे केवळ चर्चेपुरते मर्यादित राहतेय. ठाकरे ब्रँड संपवण्याचा कोणीही प्रयत्न केला, तरी राज ठाकरे यांच्यासारखा नेता असल्यामुळे तो संपणार नाही.”
सध्या मनसे-ठाकरे गट युतीची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्ष युतीबाबत अजून काही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून सकारात्मक संकेत दिले जात असले, तरी मनसेकडून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका दिसून येत आहे. राज ठाकरे स्वतः या चर्चेवर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.