विशेष प्रतिनिधी
नागपूर : आदित्य ठाकरे यांनी आपले ठाकरे आडनाव बदलून घेतलं पाहिजे. आदित्य खान किंवा आदित्य शेख केलं पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल. बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी टीका भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. ( Aditya Thackeray should change his surname Thackeray to Khan or Sheikh Nitesh Rane strongly criticizes)
प्रत्येक सणाच्या वेळी सरकारने काही ना काही बचत करण्याची मागणी का करावी? सण तुम्ही साजरे करा, पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. मीही पर्यावरणप्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा, आता हे बचावण्याचे नियम इतके का वाढवायचे? सण साजरे करायला हवेत, पण श्वास घेण्याची मुभा देखील द्यावी.” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र गौसेवा आयोगाने 3 ते 8 जून या कालावधीत पशू बाजार बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडली आहे. यांसंदर्भात नितेश राणेंना विचारले असता, राणेंनी आदित्य ठाकरेंवर जाेरदार हल्लाबाेल केला.
अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणेंना नोटीस बजावत धमकी दिली आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी आज माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका बजावली पाहिजे असं मी मानतो. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता, त्यांचे प्रबोधन कसा करू शकता, यावर भूमिका मांडली पाहिजे. आता प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे, अशा शब्दात राणेंनी प्यारे खान यांच्यावर पलटवार केला आहे.
नितेश राणे म्हणाले, देशात जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात, तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा, अशी माझी भूमिका व सल्ला आहे. जसं हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचं ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही. तसेच, मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी हा माझा चांगला सल्ला आहे, त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न कुठे? असा सवालही राणेंनी विचारला.
बकरी ईदमुळे हिंदू नागरिक अस्वस्थ आहेत, कारण त्यांच्या सोसायटीमध्ये बकरे कापले जाणार आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आणि दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होतील, उद्या यामुळे दंगली पण होऊ शकतात. पण, हे थांबवण्यासाठी जर कोणी सल्ले देत असेल तर ऐकले पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जातात, तेव्हा हिंदू समाज आक्रोश दाखवतो का? जोरजबरदस्ती करतो का? मग अबू आझमी कसं बोलतो, हम तो बकरा काटेंगे. यावरूनच हिंदू समाजाचा समजूतदारपणा दिसून येतो. त्यामुळे कोण इस्लामला बदनाम करत आहे आणि कोण फडणवीस यांची बदनामी करत आहे हे महाराष्ट्राला कळतंय. प्यारे खान यांना मी सल्ला देतो, मी काय बोललो याबद्दल त्यांनी विचार करावा आणि त्यांनीच मुस्लिम समाजाला आवाहन करायला पाहिजे की नितेश राणे जे बोलत आहे ते आपल्या हिताचे आहे, त्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करू. कारण, दोन समाजात तेढ निर्माण झाली तर अशांतता निर्माण होऊ शकते. पण, आम्ही असताना दंगली होण्याचा कारण नाही. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर इको फ्रेंडली बकरी ईद हा पर्याय आहे, असे राणेंनी म्हटलं.