विशेष प्रतिनिधी
पुणे ,: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत . विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या खरेदीत तब्बल ५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. ( Raju Shettys big revelation Jalinder Supekar and Amitabh Gupta accused of corruption worth Rs 5 crore in the purchase of Diwali snacks for prisoners)
शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली १२०० रुपये किलो दराने काजूकतली खरेदी दाखवण्यात आली, पण प्रत्यक्षात कैद्यांना तो फराळ मिळालाच नाही.” त्यांनी यासोबत काही दरपत्रकेही प्रसिद्ध केली आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होते की हल्दीराम, चितळे बंधू आणि काका हलवाई यांच्याकडून महागडे दर दाखवून स्थानिक स्तरावर कमी दरातील फराळ कैद्यांना दिला गेला. दरांमध्ये ४० ते ६० टक्क्यांची तफावत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राजू शेट्टी यांनी आणखी एक धक्कादायक बाब सांगितली की, “या पाच कोटींच्या खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट साहित्य खरेदी करण्यात आली, जी सार्वजनिक खरेदी प्रक्रियेच्या नियमांना सरळसरळ हरताळ फासणारी आहे.”
शेट्टींच्या म्हणण्यानुसार, राज्यातील विविध कारागृहांतील रेशन आणि कँटीन खरेदीतही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे. कैद्यांना खरेदी दाखवलेला फराळ दिला गेला नसून तो केवळ कागदोपत्री होता.
राजू शेट्टी यांनी खरेदीच्या दरांची तुलना करणारी पत्रके आणि इतर काही पुरावे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.
कैद्यांना काजूकतली खायला घातली म्हणता, पण त्यांनी ती खाल्लीच नाही! प्रत्यक्षात स्थानिक दुकानातील स्वस्त फराळ देण्यात आला. हे केवळ भ्रष्टाचाराचे प्रातिनिधिक उदाहरण आहे,” असे राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल, असेही ते म्हणाले.