विशेष प्रतिनिधी
नाशिक : 2014 साली आम्ही जे स्वप्न बघितले त्याची पूर्तता आज होते आहे. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, अशा शब्दांत समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण प्रसंगी स्वप्नपूर्तीचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ( The Chief Minister said the fulfillment of the dream we had in 2014 Samruddhi Mahamarg is the economic corridor of Maharashtra.)
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी ते आमणे या 76 किमी मार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
लोकार्पणानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या उर्वरित म्हणजेच 76 किमी लांबीच्या (इगतपुरी ते आमणे) मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, या महामार्गावर 73 पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये यासाठी अंडर पास आणि ओव्हर पासही बनवले आहेत. शेवटचा टप्पा 76 किमीचा आहे. यामध्ये 5 जुळे बोगदे आहेत. हा सर्वात जास्त लांबीचा हा बोगदा आहे. 60 डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात 200 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. 22 ठिकाणी सुविधा केंद्र असतील. हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत, तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक 10 लाख प्रति महिना सुरू आहे. ती आधी 2 लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल. वाशीच्या पुलावर ट्रॅफिक जॅम होते. ते कमी करण्यासाठी वाशीच्या पुलाचे लोकार्पण करत आहोत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांना वाटत होते की हे काम होणार नाही. पण आम्ही ते करून दाखवले. महायुतीच्या काळात याचे काम सुरू केले आणि आनंद आहे की, महायुतीच्या कार्यकाळातच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होत आहे. आता अशाच प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा आणि मराठवाड्यात आर्थिक बदल घडवणारा असणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.