विशेष प्रतिनिधी
गडचिरोली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात १२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये नक्षल चळवळीत डीव्हीसीएमपदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवाद्यांनी एके-४७ (AK-47) रायफलसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना संविधान भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. ( Two women Maoists surrender with AK-47 rifles CM welcomes them with a gift of Samvidhan)
देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या जवानांसोबत अभियानाची माहिती घेतली. गडचिरोली
गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार करण्यात आला. कवंडे पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. या नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश, विशाल नागरगुजे यांच्यासह १७ पोलीस जवानांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी एकलव्य हॉलमध्ये पोलीस जवानांना संबोधित केले. गेल्या तीन-चार वर्षांत नक्षल चळवळीला आळा घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाने मोठी यशस्वी कामगिरी केल्याचे कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त चाळीस माओवादी उरले असून, माओवादी चळवळीला हादरा बसवण्याचे काम पोलीस जवानांनी केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाला. आत्मसमर्पण योजनेतून अनेक माओवाद्यांना नोकरी देण्याचे काम हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि लॉइड मेटल कंपनी करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.