विशेष प्रतिनिधी
पुणे : विवाहित प्रेयसीच्या लग्नाच्या तगाद्यामुळे बहिणीच्या दीराने महिलेचा तिच्या दोन मुलांसह पेट्रोल टाकून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ( Married lover burnt to death along with two young children due to pressure from marriage mystery of triple murder revealed)
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात सापडलेल्या तीन अर्धवट जळालेल्या मृतदेहांच्या खळबळजनक प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे. ‘जय भीम, राजरत्न, मॉम डॅड, आर एस’ अशा टॅटूंमुळे आरोपीची ओळख पटली .
या प्रकरणातील आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३८) हा मृत महिलेच्या बहिणीचा दीर असून, तो एक खाजगी वाहनचालक आहे. २५ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती परिसरातील एका बंद कंपनीच्या परिसरात तीन अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. एक महिला आणि दोन लहान मुलांचा यात समावेश होता. मुलांच्या वयाचा अंदाज १ ते ३ वर्ष असा होता. महिला आणि मुलांचे मृतदेह इतके जळालेले होते की त्यांची ओळख पटवणे अवघड होते.
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. महिलेच्या हातावरील विशिष्ट टॅटूच्या आधारे पोलिसांनी तिची ओळख स्वाती केशव सोनवणे (वय अंदाजे २८) अशी पटवली. तिची दोन मुले स्वराज्य (वय २ वर्ष) आणि विराज (वय १ वर्ष) असल्याचे निष्पन्न झाले.
स्वाती सोनवणे आणि तिचा पती यांच्यात सतत भांडणे होत असत. त्यांच्या वैवाहिक वादात गोरख बोखारे हा मध्यस्थ म्हणून पडत असे. याच दरम्यान गोरख आणि स्वाती यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे स्वातीने गोरखला लग्नाचा आग्रह धरायला सुरुवात केली. मात्र गोरख लग्नास नकार देत होता.
२४ मे रोजी रात्री गोरखने स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांना मोटरसायकलवरून आळंदीतून शिरूरच्या दिशेने नेले. वाटेत रांजणगाव गणपतीजवळील एका निर्जन कंपनीजवळ, कच्च्या रस्त्यालगत गोरखने तिघांनाही लग्नाच्या मागणीचा विरोध करत गळा दाबून व डोक्यात दगड घालून खून केला. नंतर तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. एकूण २७ पोलिस पथकांची निर्मिती करण्यात आली. तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, १६,५०० भाडेकरू व स्थानिक नागरिकांची चौकशी करण्यात आली.
तसेच ज्या रस्त्यावरून आरोपी फिरला, त्या मार्गावरील प्रवाशांशीही संवाद साधून माहिती घेतली. पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोकण विभागातही शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये ३३ पोलिस ठाण्यांच्या पथकांनी योगदान दिले.
या तपासाअंती गोरख बोखारे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तपास पथकाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणात केवळ एका टॅटूच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवून, आरोपीला १२ दिवसांत अटक करणे ही पोलिस दलासाठी अभिमानाची बाब आहे.”