विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :भारतीय क्रिकेटचा सुवर्ण अध्याय लिहिणारा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. या प्रतिष्ठित यादीत समावेश होणारा धोनी हा भारताचा दहावा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला आणि ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर मॅथ्यू हेडन यांचाही यंदा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.
( Captain Cool Mahendra Singh Dhonis induction into the ICC Hall of Fame)
महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने २००७ टी-२० वर्ल्ड कप, २०११ वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एकाचवेळी आयसीसीच्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकवणारा तो जगातील एकमेव कर्णधार ठरला आहे.
धोनीने आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळून १७,२६६ धावा केल्या आणि ८२९ फलंदाजांना बाद केले. त्याच्या स्टंपिंगचा वेग, सामन्यातील शांतता आणि “फिनिशर” म्हणून त्याचा अव्वल दर्जा यामुळे तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक ठरतो.
२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या आक्रमक फलंदाजीसह आणि यष्टिरक्षणातील जलद हालचालींसह क्रिकेटविश्वात लक्षणीय प्रभाव पाडला. त्याच्या स्टंपिंग कौशल्याला “धोनी मॅजिक” म्हणून ओळखलं जातं. धोनीच्या “हेलिकॉप्टर शॉट” नेही त्याला एक वेगळा ओळख दिला.
२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या यशाने भारतीय संघाची नव्या पर्वाकडे वाटचाल सुरू झाली होती. धोनीच्या नेतृत्वात त्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला थरारक विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला गेला. यानंतर २०११ मध्ये घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध शेवटचा षटकार मारून धोनीने भारताला २८ वर्षांनी वर्ल्ड कप मिळवून दिला. ही फिनिशिंग शैली आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात कोरलेली आहे.
हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्यानंतर आपल्या प्रतिक्रियेत धोनी म्हणाला, “भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आणि संघाचे नेतृत्व करताना मिळालेला अनुभव माझ्यासाठी आयुष्यातला सर्वोच्च मान होता. आता हॉल ऑफ फेममध्ये नाव येणं हे माझ्या सर्व मेहनतीला मिळालेलं सर्वोच्च बक्षीस आहे.”