विशेष प्रतिनिधी
पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ नितीन नागनाथ अभिवंत वय ४२ मूळ गाव देवडीता मोहोळ जिसोलापूर यांचे हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आल्याने निधन झाले
ते शनिवारी (दि.७) मुंबई येथून महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते.
या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह ससून रुग्णालयातील त्यांच्या सहकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर येथे पाच वर्षांच्या सेवेनंतर ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागात २०१४ पासून कार्यरत असलेल्या डॉ. अभिवंत यांनी कार्यतत्पर शैलीमुळे वेगळा ठसा उमटविला होता.
महाविद्यालयीन जीवनापासूनच गिर्यारोहणाची आवड असलेल्या अभिवंत यांनी वासोटा किल्ला, महाबळेश्वर येथील पर्वतरांगा व अन्य ठिकाणीही गिर्यारोहण केले होते.
शनिवारी मुंबई येथून त्यांनी महाविद्यालयीन मित्रांसह हिमालयाकडे प्रयाण केले होते.
सोमवारी (दि.९) सकाळी गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना श्वासोच्छवासात अडथळा आल्याने धाप लागून घाम फुटला असता सोबत असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तात्काळ बेस कॅम्पवरील रुग्णालयात हलविले.
मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, आठ वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे.
डॉ. अभिवंत यांचे शालेय शिक्षण पुसेगाव (जि. सातारा) येथील शासकीय विद्यानिकेतनमध्ये, तर वैद्यकीय शिक्षण जीएस महाविद्यालयामध्ये झाले होते.
शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी संघटनेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांनी ससून रूग्णालयात प्रशासकीय कामकाजही यशस्वीपणे सांभाळले आहे.
अनेक राष्ट्रीय उपक्रम व संशोधनात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांचे सहयोगी प्रा. डॉ. नितीन थोरात यांनी सांगितले.
उमद्या, शिस्तप्रिय आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. अभिवंत यांनी अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला होता.