विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचा मृत्यू झाला आहे. त्या विमानाच्या क्रू मेंबर होत्या.
खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वतःही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तासांपूर्वी दिल्लीत लँड झाले होते. त्यानंतर विमान अपघाताची माहिती मिळाल्यावर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले.
एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावले होते. या विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. पण त्यानंतर 3-4 मिनिटांतच ते एका नागरी इमारतीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यात एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे या दुर्घटनेत शेकडो जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. त्यात 12 क्रू मेंबर्स व 230 प्रवासी होते. अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंघरे या 6 मराठी प्रवाशांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. पण त्यांची पुष्टी अद्याप झाली नाही. मैथिली पाटील (कर्मचारी संख्या: 80047429), दीपक पाठक (कर्मचारी संख्या: 81033187) व रोशणी सोंघरे (कर्मचारी संख्या: 80055146) हे तिघेजण अपर्णा महाडिक यांच्यासारखेच एअर इंडियाचे केबिन क्रू होते.
दुसरीकडे, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला असण्याची भीती आहे. त्यांचा विमान प्रवासातील एक फोटोही समोर आला आहे. त्यात ते कोणत्या तरी कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान, विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले.