विशेष प्रतिनिधी
मुंबई: मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. संतोष यांचे चिरंजीव विराज देशमुख आणि पुतणे सत्यजित देशमुख यांचे इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षणाचे दायित्व देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे.
( Chief Minister Devendra Fadnavis will bear the entire education expenses of the son of late Sarpanch Santosh Deshmukh of Massajog)
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कडक कारवाई करा. आरोपींची संपत्ती जप्त करण्यापासून ते मकोका लावण्यापर्यंत कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष तरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती केली. देशमुख कुटुंबाला न्याय देतानाच या कुटुंबाचा आधार हरपला असल्याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्वाचा आधार दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
कायद्यानुसार आवश्यक त्या कारवाईबरोबरच त्यांनी सहवेदना आणि सामाजिक बांधिलकी दाखवून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कै. संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख आणि पुतणे सत्यजित देशमुख यांचे इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षणाचे दायित्व स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याची घोषणा केली.
यासाठी त्यांचा प्रवेश रामरत्न एज्युकेशन फाउंडेशन संचालित एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, रेठरेधरण, ता. वाळवा, जि. सांगली येथे निश्चित करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, या निर्णयाची अधिकृत माहिती ‘वर्षा बंगला’ मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित छोट्या समारंभात, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मुलांना प्रेमळ आशीर्वाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या मुलांना आमच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देऊन त्यांची जबाबदारी पार पाडण्याचा मान देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिला आहे. आम्ही ही जबाबदारी पूर्ण निष्ठा, काळजी आणि प्रेमाने पार पाडू आणि साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरू, असा शब्द आम्ही त्यांना दिला आहे.
या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार, संचालक सागर खोत, मेजर अमृत पाटील, राहुल मोरे, अमोल पाटील, धनंजय देशमुख, विराज देशमुख, शिरीष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
ही केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक मदत नसून समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की,कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशमुख कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत आहेत.
संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे. वैभवीने ८५ टक्के गुण मिळवत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली असून, या यशाबद्दल फडणवीस यांनी तिला अभिनंदनाचे पत्र पाठवले l. तसेच थेट दूरध्वनीवरून संवाद साधत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासनात सामावून घेण्याचा म्हणजेच सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे करतानाही संवेदनशीलता दाखवत मुलं लहान असल्याने संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.