विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.
( Big blow to Congress in Sangli Vasantdada Patils granddaughter Jayashree Patil joins BJP)
जयश्री पाटील या दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी असून, त्या काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि एक प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी सादर केली होती. या बंडखोरीनंतर काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न न केल्यामुळे त्या अधिकच नाराज झाल्या.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये सक्रीय राहिलेल्या जयश्री पाटील यांनी महिला आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मजबूत जनसंपर्क साधला होता. त्या प्रभावी वक्त्या, कुशल संघटक आणि महिला मतदारांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.
पक्षातील अंतर्गत गटबाजी, कार्यपद्धतीतील त्रुटी आणि नेतृत्वाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांनी अखेर काँग्रेसचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. याच काळात भाजपकडून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला होता, ज्यामुळे भाजपमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते