विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो यांना सांगतो आज काय करायचं आणि काय नाही. कारण आजकाल उद्धव ठाकरे देखील संजय राऊत यांचे जास्त ऐकतात. त्यामुळे मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ( Bengali Babas daily activities on Matoshree Sanjay Shirsats counterattack on the Thackeray group
पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केले. संजय राऊतांच्या आरोपांना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिरसाट म्हणाले की, भरत गोगावले पूजा पाठ करणारे आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले आहे. कारण अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत किंवा जंगलात होते. त्यामुळे हे मदारीचे खेळ बंद करावेत आणि मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय? संजय राऊत यांनी सांगावे. यासंदर्भात माध्यमांनी सुद्धा माहिती घ्यावी. कारण मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. तो यांना सांगतो आज काय करायचं आणि काय नाही. कारण आजकाल उद्धव ठाकरे देखील राऊतांचे जास्त ऐकतात. त्यामुळे मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय ते शोधा, असे आवाहन शिरसाट यांनी माध्यमांना केले आहे.
शिरसाट म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व घेऊन पुढे जात आहोत. परंतु उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला आहे. परंतु एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत आणि प्रवेशासाठी तारखा ठरवाव्या लागत आहेत.
उद्धव ठाकरे सध्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबत काहीही बोलणार नाहीत. कारण त्यासाठी आवश्यक असलेला संवाद दोघांमध्ये नाही. परंतु हिंदुत्व ही आपली विचारधारा असून एकनाथ शिंदे यापूर्वीच राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यामुळे भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा असल्याचा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.