विशेष प्रतिनिधी
मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेत असलेल्या एअर इंडिया कंपनीने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत ८ उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत फ्लाइट्सचा समावेश आहे. तांत्रिक देखभाल, खराब हवामान आणि हवाई क्षेत्रावरील तातडीच्या निर्बंधांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.आठ विमानांचे उड्डाण रद्द केल्याने देशातील अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ( Eight Air India flights cancelled due to technical snag weather and airspace restrictions)
दुबई-चेन्नई (AI906), दिल्ली-मेलबर्न (AI308), मेलबर्न-दिल्ली (AI309), आणि दुबई-हैदराबाद ही चार आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली, हैदराबाद-मुंबई आणि चेन्नई-मुंबई ही देशांतर्गत उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. या फ्लाइट्स आज चेन्नई, दिल्ली, दुबई, मेलबर्न, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबई येथून उड्डाण करणार होत्या.
एअर इंडिया प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नुकसान झालेल्या प्रवाशांना संपूर्ण रक्कम परत केली जाईल किंवा त्यांच्या प्रवासाचे रीशेड्युलिंग करून दिले जाईल.
एअर इंडिया कंपनीने म्हटलं आहे की, “प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमचे कर्मचारी पर्यायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहेत. प्रवाशांना संपूर्ण रिफंड आणि योग्य तेवढ्या सोयीसाठी मदत दिली जात आहे.”
नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने देखभालीच्या प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा दाखवण्यास सुरुवात केली आहे. विमानांच्या नियमित तपासणीसह हवामान बदलांवर आणि एअर ट्रॅफिक नियंत्रणाच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेतले जात असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.