विशेष प्रतिनिधी
पुणे : पतीला आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीने मृतदेह दूर नेऊन फेकल्याचे उघडकीस आले आहे . जगतापनगर, थेरगाव येथे घडलेल्या या प्रकारात पत्नीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
तय्युबशहा उस्मानशा (रा. जगतापनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा यांनी गुरुवारी (दि.१९) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तय्युब शहा यांची पत्नी (वय ३२ ), साहिल कैलास घाडगे (वय २१) या दोघांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोसीफ याचे वडील तय्युब शहा उस्मानशा यांना पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांनी १४ जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पत्नी हिच्या सांगण्यावरून आरोपी साहिल याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे या गावच्या हद्दीत फेकून दिला. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.