विशेष प्रतिनिधी
नागपूर : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली .कुस्तीपटुंना पायाभूत सुविधा,प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ( Chief Minister Devendra Fadnavis assures that Maharashtra will be provided with training and facilities to win medals in the Olympic Wrestling Championship.)
भारतीय कुस्तीगीर महासंघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील विभागीय क्रिडा संकुलात आयोजित ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मागील काही वर्षात महाराष्ट्राने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याने गेल्या तीन वर्षात अव्वल कामगिरी केली आहे. कुस्तीतही १५ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचा दबदबा आहे. मात्र, १५ वर्षावरील वयोगटात राज्याची कामगिरी सुधारण्याची गरज आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देत महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील कुस्तीतून हा बहुमान मिळाला नाही. यापुढे कुस्तीपटुंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरते मर्यादित न राहता ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सर्व स्तरातून पोषक वातावरण होण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनही कस्तीपटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व पायाभूत सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल.
कुस्ती हा प्राचीन क्रीडा प्रकार असून रामायण आणि महाभारतामध्येही कुस्तीचे संदर्भ आढळतात. महाराष्ट्राच्या खेडया-पाडयात कुस्ती आणि कबड्डी हा खेळ मोठया प्रमाणात खेळल्या जातो. कोल्हापूर,पुणे,सातारा,अमरावती,नागपूर आदी ठिकाणी कुस्तीचे आखाडे असून तिथेही कुस्ती खेळल्या जाते . आता लाल मातीवरील कुस्ती मॅटवर आली आहे. या खेळातील बदलानुसार खेळाडूंनीही कौशल्य आत्मसात करून उत्तमोत्तम प्रदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.