विशेष प्रतिनिधी
सांगली : नीट परीक्षेसाठी बारावीच्या खासगी शिकवणीच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या शिक्षक बापाला अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात ही घटना घडली. ( Girl dies after being brutally beaten by father for getting low marks in private tutoring NEET practice exam)
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना धोंडीराम भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती. तिचे वडील हे नेलकरंजी गावामध्येच एका खासगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहेत. त्यांनी मुलीला खासगी शिकवणी लावली. या खासगी शिकवणीत घेतलेल्या बारावीच्या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले होते. त्यानंतर रागाच्या भरात त्याने मुलीला मारहाण केली. शुक्रवारी (20 जून) रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी (22 जून) वडील धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.
साधना ही अभ्यासात हुशार असून तिला दहावीला 92.60 टक्के गुण मिळाले होते. शाळेमध्ये तिचा पहिला क्रमांक आला होता. बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिने तयारी सुरू होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खासगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे रागात असलेल्या वडील धोंडीरामने घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागला होता.
गंभीर जखमी झालेल्या साधनाला उपचारासाठी दवाख्यान्यात घेऊन गेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अपराधी पित्याने आपले कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला होता. पण शवविच्छेदन अहवालातून प्रकार समोर आला आहे. धोंडीराम भोसले यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. धोंडीराम भोसले यांची पत्नी गावात सरपंच होत्या. तसेच त्यांचे वडील भगवान भोसले हे पोलीस पाटील होते. याप्रकरणी धोंडीराम भोसलेला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.