विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / वॉशिंग्टन :अमेरिकेतील शिक्षणासाठी व्हिसा अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची गोपनीयता ‘पब्लिक’ ठेवावी लागणार आहे, असा नवा आदेश अमेरिकन दूतावासाने जाहीर केला आहे. F (शैक्षणिक), M (व्यावसायिक प्रशिक्षण) आणि J (शैक्षणिक-सांस्कृतिक एक्सचेंज) प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी हा नियम तत्काळ लागू करण्यात आला आहे. (Shocking order for Indian students wishingto study in US Social media accounts must be kept public for visa)
अमेरिकेच्या ‘सोशल मीडिया व्हेटिंग’ धोरणांतर्गत, अर्जदारांच्या Facebook, Instagram, LinkedIn, TikTok आणि X (पूर्वीचे Twitter) या खात्यांवर पोस्ट करण्यात आलेल्या मजकुराचे बारकाईने परीक्षण केले जाईल. अमेरिकेविरोधी भूमिका, दहशतवादाला सहानुभूती, किंवा राष्ट्रविरोधी विचार दर्शवणाऱ्या पोस्ट्स असल्यास, संबंधित व्यक्तीला व्हिसा नाकारला जाऊ शकतो.
हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेतला गेल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मते, “सोशल मीडिया हे व्यक्तीच्या विचारसरणीचे द्योतक आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून, अशा व्यक्तींना अमेरिकेत येण्याआधीच थांबवता येते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मात्र, या निर्णयावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा आदेश माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक आणि परदेशी विद्यार्थ्यांविरोधी धोरणांचा भाग आहे. ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या व्हिसावर बंदी घालून सुरक्षा आणि फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला होता.
या नव्या अटीमुळे अमेरिकेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले व्यक्तिगत विचार, विनोदी मिम्स किंवा जुन्या पोस्ट्स सुद्धा त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
दरम्यान, भारतातील विद्यार्थी संघटनांनी आणि सोशल मीडिया तज्ज्ञांनी या निर्णयाला गोपनीयतेवर घाला असल्याचे म्हटले आहे. “एका प्रगत राष्ट्राने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ऑनलाइन उपस्थितीवर नियंत्रण ठेवणे ही मागास मानसिकतेची लक्षणं आहेत,” असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले.