विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात केवळ ५ महिन्यांत तब्बल ८ टक्के मतदारवाढ झाल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरी”चा आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देत झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…” अशा शब्दांत फटकारले. ( Saying zut Bole Kouwa Kate the Chief Minister reprimanded Rahul Gandhi over the vote rigging allegations.)
न्यूजलॉन्ड्री या काँग्रेसप्रणीत न्यूज वेबसाईटच्या एका बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबाबत आरोप केले होते. यावर राहुल गांधी यांना फटकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की
महाराष्ट्रात काँग्रेसचा झालेला पराभव तुमच्यासाठी वेदनादायी आहे, ते समजू शकतं. पण किती दिवस हवेत बाण मारत राहणार?”
राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांची आकडेवारी देत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तुमच्या माहितीसाठी एकट्या नागपूरमध्येच नव्हे, तर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये ८% पेक्षा अधिक मतदारवाढ झाली आहे. ही वाढही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या काळातील आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, माझ्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघाला लागूनच असलेल्या पश्चिम नागपूरमध्ये ७% (27,065) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्ये ७% (29,348) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे नितीन राऊत विजयी. वडगाव शेरी (पुणे) येथे १०% (50,911) मतदारवाढ असूनही शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे निवडून आले. मालाड पश्चिममध्ये ११% (38,625) मतदार वाढले, तरी काँग्रेसचे अस्लम शेख विजयी. मुंब्रा येथे ९% (46,041) मतदार वाढ असूनही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.यावरूनच मतदारवाढ हा सर्वसामान्य निवडणूक प्रक्रियेतील भाग असून, केवळ फडणवीसांच्या मतदारसंघापुरता हा प्रकार मर्यादित नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांना टोला मारत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की सहयोगी पक्षांसोबत सोडाच पण तुमच्या काँग्रेस पक्षात संवादाचा अभाव इतका आहे की, अस्लम शेख, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्यासारख्या आपल्या पक्षातील नेत्यांशी एकदाही बोलल्याशिवाय अशा ट्विट्स करता. हा काँग्रेसमधील संवाद तुटण्याचा अत्यंत वाईट नमुना आहे.
राहुल गांधींनी आपल्याच ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काही बूथवर तब्बल २० ते ५०% पर्यंत मतदार वाढले आहेत. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी अनोळखी लोकांनी मतदान केल्याची तक्रार केली आहे. निवडणूक आयोग मात्र गप्प आहे. हे साधे ‘ग्लिचेस’ नाहीत, ही सरळ मतचोरी आहे.”डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जाहीर करावे.