पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली विठुरायांच्या दर्शनाकरीता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांकरिता आयोजित चरणसेवा शिबीराचा सुमारे १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला. ( More than 15000 Warkaris benefited from the camp organized by the Chief Ministers Relief Fund and the Charity Hospital Help Deskembodying the concept of Chief Minister Devendra Fadnavis.)
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणे यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील पारगे चौक, कसबा गणपती, कस्तुरी चौक, नानापेठ, रामोशी गेट, सह्याद्री मैदान, गंगाधाम रोड, काशेवाडी, मार्केटयार्ड आणि गंगाधाम चौक या १० ठिकाणी शिबीर यशस्वीपणे पार पडली. शिबीरांमध्ये १ हजार ३७ विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सेवा बजावली.
‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा या भावनेने प्रेरित होऊन या उपक्रमात ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, संचेती महाविद्यालय, सिंहगड संस्था, रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, सूर्यदत्ता संस्था, ससून रुग्णालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नवले शिक्षण संस्था, सेवांकुर भारत आदी संस्थेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकऱ्यांची फिजिओथेरपी, थकवा कमी करणाऱ्या मालिशद्वारे उपचार करण्यासोबतच मानसिक ऊर्जा वाढवणाऱ्या संवादाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.