विशेष प्रतिनिधी
मुंबई : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी लावून अनन्वित अत्याचार केले. ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत हृदय हे लावून टाकणारा प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान हत्या दिवसाच्या निमित्ताने सांगितला. आणीबाणीतील भीषण अत्याचारांचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला. (Police threatened to rape George Fernandes mother CM recounts heart-wrenching incident of atrocities during Emergency)
जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाबतचा प्रसंग सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधींच्या हुकूमशाही विरोधात लढत होते. ते भूमिकत झाले होते. त्यांचा ठाव ठिकाणा लागावा यासाठी पोलिसांनी त्यांचे भाऊ आणि आई यांना पकडून आणले. दोघांनाही एकत्र बांधले. जॉर्ज फर्नांडिस कोठे आहेत अशी विचारणा केली. ते सांगत नाही पाहिल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावाला पोलिसांनी धमकी दिली की जर जॉर्ज कुठे आहे सांगितले नाही तर तुमच्यासमोरच आईवर बलात्कार करू. या घटनेचा प्रचंड मानसिक धक्का जॉर्ज यांच्या भावाला बसला. आयुष्यात ते पुन्हा कधीही या धक्क्यातून सावरू शकले नाहीत.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय : संविधान हत्या दिवस 2025’ कार्यक्रम आणि आणीबाणीविरोधात झुंजणाऱ्या सेनानींचा गौरव करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री अशोक उईके आणि उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वच विरोधी पक्ष त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ज्यांचे लग्न झाले नव्हते, त्यांचेही कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले. अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. अनुशासनाच्या नावाखाली अशरक्षः उन्माद त्या काळात देशाने पाहिला. या सर्वांची बातमी होऊ नये म्हणून वृत्तपत्रावर निर्बंध आणले गेले”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या विरोधात बोलताना दिली.
या देशात पन्नास वर्षांपूर्वी लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केवळ आणीबाणी लागू करून विरोधातील सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले नव्हते तर तर भारतीय संविधानात देखील बदल केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील मुलभूत अधिकार माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते. मात्र तेच अधिकार इंदिरा गांधी यांनी संपवले होते. त्या जागेवर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला जागा देण्यात आली होती. पंतप्रधान याच्या पदाला कोणत्याही न्यायालयाच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आले होते, असे फडणवीस म्हणाले.
या वेळी फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाला अमर्याद अधिकार दिले होते. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाला देखील संसदेच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न संविधानाला बदलून करण्यात आला होता. भारतीय लोकशाहीला संपवण्याचे काम 50 वर्षांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केले होते.
भारताच्या लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही संग्राम सेनानी लढले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी मिळून अशी लढाई लढली की, ज्यामुळे भारताचे संविधान आणि भारताची लोकशाही वाचली. त्यामुळे हा दिवस देशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या पुढच्या पिढीला भारताची लोकशाही आम्ही वाचवली, हे सांगावे लागणार आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.