विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना इशारा दिला आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सॲप स्टेटसवरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अगोदरच गलितगात्र झालेल्या ठाकरे गटात यामुळे पळापळ सुरु झाली असून उद्धव ठाकरे आजच त्यांची भेट घेतली. (Regret after time passes Bhaskar Jadhavs direct warning to Uddhav Thackeray)
यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मी नाराज नाही, हे माध्यमांसमोर वारंवार सांगताना भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, असे म्हटले आहे.
यापूर्वी नाराजीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले होते की, मी आधी गोष्टी करतो. त्यानंतर सांगतो. मी नाराज असल्याच्या चर्चेला अर्थ नाही. पण उद्या नियतीच्या पोटात काय दडलंय हे कुणालाही सांगता येणार नाही.
भास्कर जाधव यांनी तीन दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही. मी माझ्या मनातील व्यथा मांडली. त्यावर कोण काय बोलले त्यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत, त्यावर मी खुलासा करत नाही. मी आधी गोष्टी करतो. त्यानंतर सांगतो. पण नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय, हे कुणालाही सांगता येत नाही.
भास्कर जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा केली असल्याचे सांगितले होते. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत आहे. मी ही जबाबदारी केवळ अंगावरच घेऊन थांबणार नाही, तर पक्षालाही यश मिळवून देईन, असा दावा त्यांनी केला होता.
भास्कर जाधव नाराज असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. भास्कर जाधव हे कोकणातच जास्त राहतात. त्यामुळे ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.