विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या कथित हिंदीच्यासक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. (MNS to hold march in Mumbai on July 6 against Hindi-mandatory decisionRaj Thackeray announces will also talk to Uddhav Thackeray)
महायुती सरकारने राज्यात त्रिसुत्री भाषा धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर हल्ला चढवत मनसे कोणत्याही स्थितीत हिंदीची सक्ती करू देणार नाही असे सांगितले आहे. राज ठाकरे यांनी आपला विरोध अधिक कडवा करत हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची भूमिका फेटाळून लावली. हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. खरेतर कोणत्याही भाषेची सक्ती करण्याचा निर्णय इयत्ता पाचवीनंतरच यावा. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही सक्तीचा कोणता मुद्दा नाही. त्यांनी हा मुद्दा राज्यांवर सोडले आहे. दादा भुसे यांनीही हे मान्य केले आहे. त्यानंतरही सरकार हिंदीची सक्ती का करत आहे हे अनाकलनीय आहे.
राज ठाकरे म्हणाले, बीएसई किंवा तत्सम बोर्डाच्या शाळा ह्या आयएसआय अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढण्यात आल्या होत्या. पण आता त्याच शाळांचे वर्चस्व राज्यांच्या शाळांवर गाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र व आयएसआय अधिकाऱ्यांचा हा अजेंडा आहे. मी शिक्षण मंत्र्यांना यासंबंधी प्रश्न केला. त्यावर ते तेच ते बोलत होते. या संपूर्ण गोष्टीला आमचा विरोध होता, आहे व राहणार. मनसे हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणी 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल.
आम्ही यासंबंधी शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक व इतर लोकांशीही चर्चा करणार आहोत. माझे पत्र त्यांना जाणार आहे. 6 जुलै रोजी सकाळी 10 वा. गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी आम्ही मोर्चासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. महाराष्ट्राने या प्रकरणी आपली संपूर्ण ताकद लावावी. या मोर्चात सर्व तज्ज्ञ, पालक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या सरकारला महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे कळले पाहिजे. मी या प्रकरणी इतर राजकीय पक्षांशीही चर्चा करणार आहे. या मोर्चात महाराष्ट्रातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राचे मराठीपण घालवण्याचा कट आहे. तो या मोर्चाद्वारे सर्वांनी एकत्र येऊन उधळवून लावावा. इथे कोणताही झेंडा नाही. पण मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी महाराष्ट्रातील मराठी बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे. या प्रकरणी सर्वजण विरोध दर्शवत आहेत. त्यामुळे मला अशावेळी हेही बघायचे आहे की, राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण-कोण या मोर्चात सहभागी होतील व कोण येणार नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.
या मोर्चासाठी मनसे पक्ष, संघटनांशी बोलणार आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही बोलणार का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंशी बोलणार. त्यावर आमची माणसं त्यांच्या माणसाशी बोलणार. इतक्या दिवस मी जे बोलत होतो ना, कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ते तुम्हाला ६ तारखेला कळेल, असे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केला. त्यामुळे ६ जुलै रोजी राज्यात भाषिक अस्मितेसाठी दोन ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल समोर येत आहे.