विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरूडच्या बाई अशा आशयाचा खासदार मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणारा एक बॅनर बालगंधर्व रंगमंदिर चाैकात लावण्यास येऊन त्यावर वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आराेपी विराेधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police register case against Thackeray group for defaming MP Medha Kulkarni putting up banners)
रेल्वे विभागातर्फे नुकतेच पुणे, आहिल्यानगर व साेलापूर मधील खासदारांची एक बैठक पुण्यात पार पडली. यावेळी पुणे रेल्वे स्थानकास बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. यावरुन मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका केली जात आहे. महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या घटवाई यांनी याप्रकरणी थेट राज्य महिला आयाेगाकडे देखील तक्रार केली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली असून हा महिलांचा अपमान आहे त्यामुळे याबाबत संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परशुराम हिंदु सेवा संघा तर्फे देखील याबाबतचे कारवाई करण्याचे निवेदन डेक्कन पोलिसांना देण्यात आले हाेते.
बालगंधर्व चौकात एक बॅनर लावला असून त्यावर बाजीराव पेशवे, पेशवाई आणि ब्राम्हण समाजाची बदनामी हाेईल अशा भाषेत मजकूर असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला हाेता. डेक्कन पोलिस ठाण्यात कमलेश प्रधान (वय- 47,रा. धायरी,पुणे) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आराेपीवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244, 245 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन पोलिस पुढील तपास करत आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेपार्ह मजकुर व फाेटाे असलेला बॅनर लावण्यात आलेला असून त्यावर शहराध्यक्ष यांचे फाेटाे देखील वापरण्यात आले आहे. तसेच शिवसेना उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड व विभाग समन्वयक विलास साेनवणे, विभाग संघटक अतुल दिघे यांचे फाेटाे व नाव देखील आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांना संबाेधून ‘काेथरुडच्या बाई’ उल्लेख करत आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा’ असा मजकूर टाकण्यात आला. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी याबाबत कारवाई मागणी केली.